Playstore Icon
Download Jar App
Personal Finance

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींकडून ८ मोलाचे आर्थिक सल्ले – जार ॲप

December 30, 2022

कुबेरासारख्या श्रीमंत लोकांकडून आर्थिक व्यवहाराबद्दल चार युक्तीच्या गोष्टी शिका आणि तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी त्याचा फायदा मिळवा.

लखपती बनण्याचे मर्म आपल्या सर्वांनाच माहिती करून घ्यायचे असते, नाही का? जगातल्या धनाढ्य व्यक्ती त्यांचे पैशांचे व्यवहार कसे सांभाळतात आणि कसा विचार करतात हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं ना ?

तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असो ती जास्त चांगली करणे कायमच शक्य असते. श्रीमंत लोकांचा स्वतःचा आर्थिक सल्ला जवळजवळ कोणत्याही परिस्थितीत उपयोगी ठरू शकतो.  

तर मग संपत्तीबद्दलचा तुमचा दृष्टिकोन बदला आणि या धनाढ्यांसारखा विचार करायला लागा!

अतिश्रीमंत लोकांकडून आयुष्याबद्दल असे काही स्वानुभवाचे बोल आणि सल्ले मिळवा की तुमच्या वेल्थ मॅनेजरलाही हेवा वाटेल, तयार आहात ?‍

१. शुभस्य शीघ्रम्  

७३.३ करोड डॉलर्सच्या संपत्तीचे मालक आणि मेक्सिकोचे सर्वात श्रीमंत व्यावसायिक कार्लोस हेलू यांनी एकदा सांगितले आहे की “शक्य तितक्या लवकर पैसे शिल्लक ठेवणे सुरू करा”.  

तुम्ही कोणतेही काम करत असाल तरीही जितक्या लवकर तुम्ही बचत करणे आणि तुमच्या पैशांचे व्यवस्थापन करणे सुरू कराल तितकेच तुमचे भविष्य अधिक चांगले असेल.

आपल्या वडिलांच्या कंपनीसाठी काम करून दर आठवड्याला २०० पेसोंची कमाई करत वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी एका मेक्सिकन बँकेमधे गुंतवणूक करायला सुरुवात केली.   ‍

२. साधी राहणी  

जगातले आजवरचे सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफे अतिशय साधेपणाने १९५७ मध्ये ३१,५०० डॉलर्सना घेतलेल्या आपल्या घरात राहतात. तरुणांसाठी त्यांचा, “तुम्ही जितके साधे आहात तितक्याच साधेपणाने तुमचे आयुष्य जगा” हा सल्ला प्रसिद्ध आहे. तुम्ही जर नेहमीच अनावश्यक गोष्टींच्या मागे असलात तर मग हे गृहितच धरा की तुमची आर्थिक वाट बिकटच असणार, तो काही सरळसोट शिखरावर नेणारा रस्ता असणार नाही.  

‘तुमचे कशावर प्रेम आहे ते शोधा’ यावरही त्यांचा खूप भर असतो. तुम्ही मजुरीचेही काम करत असलात तरी तुमची अतिशय आवडती गोष्ट कोणती ते शोधा आणि त्यासाठी वेळ काढा. यश मिळवण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग आहे.

आजच्या स्पर्धेच्या जगात तुम्हाला तुमचे काम आवडत नसेल तर नोकरी आणि बाजार या दोन्ही क्षेत्रांमध्ये ते तुमच्यासाठी नुकसानदायक आहे.‍

३. अनावश्यक खर्च टाळा

आयकियाचे जनक इंग्वार कांप्राड यांचा विश्वास आहे की तुमच्याकडे खर्च करायला मुबलक पैसा असला तरीही काही खर्च अनावश्यकच असतो.

इतर अनेक अतीश्रीमंत व्यक्तींप्रमाणे तेदेखील खाजगी जेटने नाही तर इकॉनॉमी क्लासने प्रवास करतात आणि दहा वर्षं जुनी व्हॉल्व्हो चालवतात.

‍“आधुनिक गाड्या, मोठमोठी बिरुदे, गणवेश किंवा इतर प्रतिष्ठादर्शक गोष्टींची आपल्याला गरज नाही. आपली मदार आहे ती आपल्या बळावर आणि इच्छाशक्तीवर” असे कांप्रांड यांनी आपल्या स्मरणिकेमध्ये लिहिले आहे.

त्यांच्या आर्थिक सल्ल्याचा भर आहे तो गरजा आणि इतर इच्छा यांच्यात फरक करण्यावर.‍

४. अर्थसंकल्प बनवा आणि तो कसोशीने पाळा

बँकर्स लाईफ अँड कॅज्युअल्टी कंपनीचे एकमेव भागधारक जॉन डोनाल्ड मॅकआर्थर यांची निव्वळ संपत्ती १९७८ मध्ये त्यांच्या मृत्यूच्या वेळी १ करोड डॉलर्स (आजचे ३.७ करोड डॉलर्स)  इतकी होती.

मॅकआर्थर यांनी त्यांची कारकीर्द सुरू केली ती एका लहानशा (व्यवसायाच्या) संपादनाने आणि मग त्यांचा व्याप वाढवत नेला.

त्या जमान्यात हॉलीवुडचं केंद्रस्थान म्हणजे निव्वळ भपका आणि आकर्षकपणा. असं असतानाही मॅकआर्थर कधीही त्याला बळी पडले नाहीत. त्यांची जीवनशैली अतिशय साधी होती.    

त्यांनी कधीही चैनींवर पैसे उधळले नाहीत की प्रेस एजंट ठेवले नाहीत. वार्षिक २५,००० डॉलरच्या बजेटमध्ये ते राहत.   ‍

“काटकसरी असणं हा चांगला व्यावसायिक असण्याचाच एक मार्ग आहे” ही त्यांची उक्ती प्रसिद्ध आहे.   ‍

५. कर्जमुक्त व्हा

“इतरांचा पैसा काही काळ वापरण्यासाठी पैसे देण्यानं तुम्ही जास्त गरीब होता. इतरांना तुमचे पैसे वापरू देण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेण्यानं तुम्ही जास्त श्रीमंत होता.” असं वॉल स्ट्रीटवरील एक माजी विश्लेषक स्टेसी जॉन्सन म्हणतात.  

पुढं स्टेसी हेही स्पष्ट करतात की तुम्हाला तग धरून राहण्यासाठी आवश्यक असेल तर पैसे उसने घेणे काही वाईट नाही. पण शक्यतोवर ते टाळलेले चांगले असंही ते सांगतात.

तुमच्यावर जितके कमी कर्ज असेल तितकीच तुमची आर्थिक स्थिती जास्त चांगली असेल.‍

६. दीर्घकालीन विचार करा

“आज कुणी सावलीत बसले असेल तर ते एवढ्यासाठीच की कुणीतरी फार आधी एक झाड लावले होते”.   ‍

बर्कशायर हॅथवेचे प्रमुख कार्यकारी संचालक वॉरेन बफे यांचे हे अजून एक ब्रीद. याचा अर्थ असा की स्थिर, दीर्घकालीन गुंतवणूक ही केव्हाही तात्पुरत्या, डळमळीत गुंतवणुकीपेक्षा वरचढ असते.    

ते कमी मूल्यमापन असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि अगदी दीर्घ काळ, जवळजवळ कायमसाठीच, ती तशीच राखतात.

त्यांचा सल्ला आहे की यशस्वी गुंतवणूक हा काही ‘चुटकीसारशी श्रीमंत व्हा’ छाप कार्यक्रम असू शकत नाही. तत्कालीन जोरात चालणारे समभाग, नवे कोरे स्टार्ट-अप आणि ढिगाने नफ्याचे आश्वासन देणाऱ्या शंकास्पद गुंतवणुकी यांच्यापासून सावध राहिलेलेच बरे.  ‍

७.  उद्दिष्टे ठरवा आणि ती प्राप्त करण्यासाठी शक्य ते सर्व काही करा

४ कोटी डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीचे मालक ब्रिटिश कोट्याधीश आणि व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांच्याकडे पूर्वी होती फक्त एक उद्दिष्टांची यादी.

ही उद्दिष्टे काही वास्तवाशी मेळ खणारी होती असे नाही. पण तरीही एकदा ठरवलेल्या उद्दिष्टांचा त्यांनी पाठपुरावा केला. त्यांची ही उद्दिष्टे एक दिवस त्यांना कुठे घेऊन जातील याची त्यांनाही काही कल्पना नव्हती.

आज या कोट्यधीशाने अवकाशाच्या सीमेकडे उड्डाण केले. १७ वर्षांपूर्वी त्यांनी सुरू केलेल्या प्रकल्पाचा हा प्रतिकात्मक अर्थाने मैलाचा दगड होता. ते आता अवकाश प्रवासाच्या नव्या युगाचे प्रवर्तक ठरले आहेत.    

लिंक्ड इनवरील त्यांच्या वार्तापत्रात “कधीही मनात शंकेची पाल चुकचुकली की मी स्वतःला आठवण करून देतो की स्वप्नं कधीच एका सरळसोट रेषेप्रमाणे जाणारी नसतात.”

८. तुमचे पैसे बँकेत ठेवू नका, ते गुंतवा

बिल गेट्सना कोण ओळखत नाही ? मायक्रोसॉफ्टचे हे संस्थापक १५० कोटी डॉलर्सच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांचे मानवतावादी कामही सर्वपरिचित आहे.

इतर अनेक कोट्याधीशांप्रमाणे गेट्स यांनाही पैसे बँकेत ठेवण्यापेक्षा ते खेळते ठेवणे महत्त्वाचे वाटते.

“जास्तीत जास्त रक्कम रोख किंवा तत्सम मार्गाने ठेवण्याच्या बचावात्मक पवित्र्यात आम्ही नाही”.

२०१९ मधे ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत ते असे म्हणाले. शिवाय त्यांनी पुस्ती जोडली की “समभागांमधील गुंतवणूक ६०% पेक्षा अधिक ठेवण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे”  

त्यांच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमधील स्थावर मालमत्ता आणि संग्राह्य वस्तू इत्यादी वैविध्यपूर्ण गुंतवणूकीमुळे त्यांची संपत्ती सुरक्षित आहे.    

त्याबद्दल एक इंग्रजी म्हण प्रसिद्ध आहे “तुमची सगळी अंडी एकाच टोपलीमध्ये ठेवू नका”.‍

श्रीमंत लोकं त्यांची सर्व संपत्ती कधीच एक किंवा दोनच समभागांमध्ये गुंतवत नाहीत.  

त्यामुळेच समभाग, रोखे, म्युच्युअल फंड्स, डिजिटल गोल्ड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांमधे गुंतवणूक करणे फार महत्त्वाचे आहे.

व्यावसायिक आणि स्थावर मालमत्ता, संग्राह्य वस्तू वगैरे सर्व तुमच्या पोर्टफोलिओचा भाग असू शकतात. ‍

गोळाबेरीज

श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या अनुभवांमधून आपण बरेच काही शिकू शकतो. यातली प्रत्येक व्यक्ती बाजारात एक विद्यार्थी आणि एक मार्गदर्शक नेता म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

आयुष्यात काहीतरी करून बघितल्यावर, अपयशातून आपण शिकत जातो. कसे, ते सर्वस्वी आपल्यावरच आहे. आपण काय शिकलो आणि पैशांबद्दलचा आपला दृष्टिकोन काय आहे यानेच सगळा फरक पडतो.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा सल्ला आता तुमच्याकडे आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात तो कशा प्रकारे प्रत्यक्षात अंमलात आणणार आहात?

 

Subscribe to our newsletter
Thank you! Your submission has been received!
Oops! Something went wrong while submitting the form.