मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना आर्थिक सजगता सुरूवातीपासूनच यावी यासाठी तुम्ही काय करू शकता त्याचा विचार करा. ‘पैसे झाडावर लागत नाहीत’ ही उक्ती आपण सर्वांनीच लहानपणी ऐकलेली असते. हे शहाणपणाचे शब्द आपल्या आई-वडिलांनी किंवा शिक्षकांनी आपल्याला शिकवले असतील आणि बहुदा तिथेच आपले आर्थिक साक्षरतेचे शिक्षणही संपुष्टात आले.
पालक मुलांना अनेक गोष्टी शिकवतात – आपल्याकडे असेल ते वाटून घेणं, सायकल चालवणं, स्वयंपाक करणं किंवा गाडी चालवणं. पण पैसे कसे सांभाळावे हे शिकवणं मात्र राहून जातं असं दिसतंय.
प्रश्न पैशांचा असतो तेव्हा अज्ञानात सुख असतं असं म्हणणं धाडसाचं ठरेल. हे अज्ञान तुम्हाला अक्षरशः महागात पडू शकतं.
आपल्याला शाळेत कधीच आर्थिक शिक्षण मिळालं नाही. बहुतेक म्हणूनच आपल्या मुलांच्या वाढत्या वयात ते किती महत्त्वाचं आहे हे आपल्या कधी लक्षात येत नाही.
त्यांनीही आपल्यासारखंच पैशांबद्दल अज्ञानातच मोठं व्हावं असं तर आपल्याला निश्चितच वाटत नाही, हो ना? लहान वयापासून पैशांबद्दल माहिती असल्याने मुलांना फायदाच होतो असं संशोधनानं सिद्ध झालेलं आहे.
त्यांच्या सर्वांगीण विकासालासुद्धा त्याने हातभार लागतो.
केंब्रिज विद्यापीठाच्या एका संशोधनाने दाखवले आहे की आर्थिक सवयींचा पाया मुलांच्या वयाच्या सातव्या वर्षीच घातला जातो. कोणत्याही दृष्टीने पाहिलं तरी हे वय खूपच कोवळं आहे.
इंग्लिशमध्ये संवाद साधता येणं हे जसं आजच्या जगात एक आवश्यक कौशल्य आहे तसं आर्थिक साक्षरताही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे.
तुमच्या मुलांना लहानपणापासूनच आर्थिक साक्षरतेचे धडे कसे द्याल?
मुलांना आर्थिक साक्षरतेची मौल्यवान भेट देण्यासाठी इथे आम्ही तुमच्यासाठी काही पद्धती सांगत आहोत:
१. त्यांना हातखर्चासाठी पैसे द्या
मुलांना हातखर्चासाठी पैसे किंवा पॉकेट मनी देणं हा त्यांना स्वतःला पैसे सांभाळण्याचा अनुभव देण्याचा उत्तम मार्ग आहे.
त्यातून ते विचारपूर्वक खर्च करणं आणि बचत करणं शिकतील आणि बिनधास्त उधळपट्टी करण्यातला धोकाही त्यांना कळेल. आयुष्यात नंतर असेल त्यापेक्षा कितीतरी कमी धोका त्यात आत्ता आहे.
मुलांनाही त्यांनी त्यांच्या पैशांनी घेतलेल्या वस्तूंची जास्त कदर असेल.
किती पॉकेट मनी द्यावा याबद्दल तुमच्या मनात गोंधळ असेल तर हे लक्षात घ्या की याचे काही नेमके नियम नाहीत. पण त्यांनी हे पैसे कमवून मिळवावेत असा प्रयत्न करा.
पैसे कसे काम करतात याचे ज्ञान त्यांना यातून मिळेल.
हा पॉकेट मनी घरात स्वच्छता करणं, खेळणी नीट ठेवणं, कपडे घडी करणं, लहान भावंडांना सांभाळणं अशा कामांवर आधारित असावा.
तुम्ही जी काही रक्कम निवडाल ती तुमच्या मासिक बजेटमध्ये दरमहा असणार आहे हे लक्षात घ्या. तुम्ही आणि तुमचे मूल, दोघांसाठी हा आनंदाचा मामला होईल असा प्रयत्न करा.
२. पैसे कुठून येतात हे त्यांना समजावून सांगा
तुमची मुले पैशांबद्दल शिकत असतात तेव्हाच त्यांना पैसे कुठून येतात हे समजावून सांगा.
पैसे मुख्यतः काम करून मिळवावे लागतात हे त्यांना पैसे मिळण्याच्या इतर कोणत्याही मार्गाआधी कळायला हवे.
पैसे काही असेच आई-बाबांच्या बँकेतून येत नाहीत हे त्यांना सांगा.
त्यांना तसं वाटत असेल तर त्याचं कारण हेच आहे की त्यांना काहीही हवं असलं की त्यासाठी तुम्ही त्यांना पैसे देता.
त्यांना हे समजावून सांगा की ‘काम केलं तर पैसे मिळतात, नाही केलं तर मिळत नाहीत’.
हाच पैशाबदद्ल त्यांचा पहिला धडा असूदेत.
३. वाटून घेणे, बचत करणे आणि खर्च करणे - त्यांना या गोष्टी शिकवा
एकदा का पैसे कसे येतात हे तुम्ही त्यांना सामजावलं की मग त्यांना पैशांबद्दल या तीन महत्त्वाच्या गोष्टी शिकवा – पैसे वाटून घेणे, बचत करणे आणि खर्च करणे.
या तीन गोष्टींमधील सर्वात महत्त्वाचे आहे ते वाटणे. त्यातूनच मुलांना लहान वयापासूनच इतरांना मदत करण्याचे मोल कळते.
बचत करणे आणि खर्च करणे याचा मुद्दा येतो तेव्हा तुमच्या मुलांना त्यांना मिळणाऱ्या पैशांतून प्रत्येक वेळी काही भाग बचत म्हणून वेगळा काढून ठेवायला आणि काही खर्चासाठी वेगळा काढायला शिकवा.
एकदा का खर्च केला की त्यांचे पैसे गेले हे त्यांना नीट समजवा.
काही वेळा मुले काही चुकाही करतील. पण तुमच्या छत्रछायेतच हे झालेले केव्हाही जास्त चांगले.
४. त्यांचे पैसे नीट ठेवायला त्यांना ३ पिगी बँक द्या
मुलांना त्यांचे पैसे ठेवायला एकाऐवजी तीन पिगी बँक द्या. ‘खर्चासाठी’, ‘बचतीसाठी’ आणि ‘देण्यासाठी’. तुमच्या मुलाला कधीही पॉकेट मनी किंवा कोणत्याही कामासाठी, वाढदिवसासाठी असे इतर कोणतेही पैसे मिळाले की ते या तीन बँकांमध्ये विभागून ठेवायला त्यांना सांगा.
जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना पॉकेट मनी देता तेव्हा ते तो कसा खर्च करणार आहेत याबद्दल त्यांच्याशी बोला.
मुलांच्या ‘विश लिस्ट’ च्या जवळच त्यांची पिगी बँक ठेवा म्हणजे त्यांना त्यांची खर्चाची आणि बचतीची उद्दिष्टे कायम लक्षात राहतील.
मुलांना त्यांचे पैसे ते कशा प्रकारे विभागतील आणि त्यांचे काय करतील हे करण्याचे स्वातंत्र्य देणे हाच या शिक्षणाचा हेतू आहे.
यामुळे मुलांना आर्थिक बाबतीत आत्मविश्वास तर येईलच. शिवाय पालकांनाही मुलांबरोबर आर्थिक व्यवस्थापनाबद्दल जास्त संवाद साधायची संधी मिळेल.
५. शॉपिंग करताना शिक्षण
मुलांना तुमच्या बरोबर शॉपिंगसाठी न्या आणि त्यांनाही तुमच्या निर्णय प्रक्रियेत सामील करून घ्या.
तुम्ही बाजारात जाता तेव्हा मुलांना तुम्हाला किती पैसे खर्च करायचे आहेत आणि तुमचे प्राधान्य काय आहे हे सांगा.
तुम्ही इतर काही न घेता एखादी ठराविक वस्तू निवडता तेव्हा असे का हे त्यांना सांगा. सवलती आणि कूपन्स कशी वापरली जातात हे त्यांना समजावून सांगा. मुले तुमचे वागणे पाहून त्याचे अनुकरण करतील हे लक्षात ठेवा.
मुलांना आपल्या आपण खर्च करण्यासाठीही थोडी थोडी रक्कम देत जा. मुलांना २० रुपयेदेखील त्यांना हवे तसे खर्च करायला मिळाले की किती आनंद होतो ते पाहून तुम्ही चकित व्हाल!
मुलांना सुद्धा बजेटमध्ये राहून खर्च करण्याचे महत्त्व समजेल.
६. पैशांचा समावेश असलेले खेळ खेळा
मुलांना धडे देण्याचा एक अतिशय चांगला मार्ग आहे त्यांना तुम्ही काही शिकवत आहात हे न कळता शिकवण्याचा.
बिझनेस किंवा लाईफ सारखे खेळ खेळा ज्यात आर्थिक व्यवहार समजायला मदत होते आणि हे खेळ खेळताना त्यांना त्यांचे डावपेच आखायला मदत करा.
मुलांना तुम्ही खेळत आहात असेच वाटेल. पण त्यातून मुले बजेट तयार करणे आणि भविष्यासाठी नियोजन करणे या गोष्टी शिकतील.
खेळांतूनच मुले कारण आणि परिणाम यांमधला संबंध शिकतात, चुकांबद्दल आणि चांगले निर्णय घेतल्यास कसे चांगले फळ मिळते हे शिकतात. .
अगदी सहसा न बोलण्याचे विषयसुद्धा विशेष दडपणाशिवाय बोलता येतात.
७. आर्थिक चर्चा आणि मोठी खरेदी यात मुलांना सहभाग घेऊ द्यात
सुट्टीसाठी कुठे जावे याचा विचार करत आहात? नवे काही साधन घेण्याचा विचार करत आहात? मुलांनाही त्यात सामील करून घ्या. त्यांना तुमच्या विचारमंथनात सहभागी होऊ द्या.
त्यांना निर्णय घेण्यात कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात ते सांगा. खरेदी करण्यापूर्वी तुमचे पर्याय कोणते आहेत त्याची तुलना करायला तुम्हाला मदत करायला त्यांना सांगा.
आपल्या पूर्ण कुटुंबासाठी चांगला निर्णय घ्यायला मदत केल्याबद्दल त्यांना फार आनंद वाटेल हे आम्ही तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो.
पैशांबद्दलची चर्चा ही मोकळी ढाकळी असावी. अगदी जेवणाच्या टेबलवरही अशा चर्चा होऊ शकतात.
तुमची मुले त्यात पूर्णपणे सामील होण्याइतकी मोठी नसली तरी हरकत नाही. यामागे हेतू हा आहे की एक कुटुंब म्हणून विनासंकोच आणि कोणत्याही ताण-तणावाशिवाय पैशांबद्दल बोलण्याचा मोकळेपणा तुमच्यात असावा.
८. त्यांना बजेटला अनुसरून वागायला शिकवा.
आपल्या खर्चाचा मागोवा घेण्याची आवश्यकता त्यांना शिकवा.
मुलांना त्यांनी पैसे कसे खर्च केले याचा दर आठवड्याला हिशोब ठेवायला सांगा. दर महिन्याला त्याचा तक्ता बनवायला सांगा. याने त्यांचे नक्कीच डोळे उघडतील.
कोणत्याही वयात तुमचे पैसे नक्की कुठे जात आहेत हे नीट माहिती असणे हा चांगली बचत करण्याचा महत्त्वाचा भाग आहे.
मुलांना ते त्यांचे पैसे कसे खर्च करतात आणि सवयी बदलल्यास त्यांची बचतीची उद्दिष्टे कशी साध्य करू शकतात याचा विचार करायला प्रवृत्त करा.
९. त्यांच्याबरोबर एक विशलिस्ट बनवा
आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींची यादी करणं किंवा उद्दिष्टे ठरवणं हा आर्थिक साक्षरतेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
आपल्याला हवे ते सारे काही आपल्याला एका फटक्यात मिळू शकणार नाही. पण नियोजन केले तर यथावकाश आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.
हा खरोखर मुलांना शिकण्यासाठी एक फार चांगला धडा आहे ना? तुमच्या मुलांबरोबर बसा आणि त्यांना पाच गोष्टींची विशलिस्ट बनवायला सांगा.
मग त्यांना या लिस्टमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट आधी आणि कमीत कमी महत्त्वाची शेवटी अशा क्रमाने यादीतील गोष्टी लिहायला सांगा.
ही यादी करून झाल्यावर या गोष्टी मुलांना कशा प्रकारे मिळू शकतील याबद्दल त्यांच्याशी बोला.
मुलांना पैशांबद्दल शिकवणं काही तितकं अवघड नाही हे आता तुमच्या लक्षात आलं असेल ना? त्यासाठी हवा फक्त थोडासा पुढचा विचार, संयम आणि कल्पनाशक्ती.
मुलांबरोबर पैशांबद्दल नुसती चर्चा करण्यानेही त्यांना प्रश्न विचारण्याची आणि आयुष्यभर उपयोगी पडतील अशी कौशल्ये मिळवण्याची प्रेरणा मिळेल.
आर्थिक साक्षरता कंटाळवाणी वाटू नये म्हणून तुम्ही मुलांना आर्थिक प्रश्नमंजुषा आणि स्पर्धा वगैरेमध्ये भाग घ्यायला उत्तेजन द्या.
तुमच्या मदतीसाठी आम्ही तुमचे वैयक्तिक आर्थिक व्यवहार कसे सांभाळावे आणि तुमचे आर्थिक व्यवस्थापन काकणभर अधिक चांगले करण्यासाठी शहाणपणाच्या गोष्टी सांगणाऱ्या आर्थिक व्यवस्थापनाच्या टिप्स घेऊन आलो आहोत.